दोन प्राण्यांच्या झटापटीत बिबट्याचा मृत्यू

देवरूख कर्ली येथे मृतावस्थेत आढळला बिबट्या

संगमेश्वर:- तालुक्यातील कर्ली येथे बिबट्या रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला. दोन प्राण्यांच्या झटापटीत या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.

कर्ली येथील सुधीर चाळके यांच्या राहते घराजवळ सकाळी ८.३० वाजता बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. पोलीस पाटील सुयोग जाधव यांनी याची खबर वनविभागाला दिली. यानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. त्यावेळी बिबट्या मृत अवस्थेत पडलेला दिसला. सदर ठिकाणी दोन प्राण्यांच्या झटापटी झाल्याचे दिसून आले. परिसरामध्ये ठिक ठिकाणी रक्त पडलयाचे वनविभागाच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर बिबट्याच्या डाव्या पायाच्या वरील बाजूस गळ्याच्या खाली ठिकठिकाणी चावा घेतल्याचे व झटापटीच्या खुणा दिसून आल्या.

सदर बिबट्यास देवरुख येथे आणून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दोन प्राण्याच्या झटापटीमध्ये सदर बिबट्या मृत झालेचे नमूद केले आहे. मृत बिबट्याचे शवविच्छेदन युवराज शेट्ये यांनी केले.बिबट्या अंदाचे अडीच वर्षाचा असुन तो नर आहे. सदर बिबट्यास लाकडाची चिता रचून दहन करण्यात आले.

सदरची कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांका लगड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल तौफिक मुल्ला , वनरक्षक अरुण माळी, सहयोग कराडे, आकाश कडुकर , सुरज तेली यांनी केली. यावेळी समीर चाळके , संतोष चाळके व ग्रामस्थ उपस्थित होते.