गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या दोघा पर्यटकांना जीवदान

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथील समुद्रात दोन पर्यटक बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. बुडणाऱ्या दोन पर्यटकांना तेथील जीवरक्षकांनी वाचवले. रविवार 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.45 वा. सुमारास ही घटना घडली.

अंशूमन पाठक (28) व सोनू शेख (32, दोन्ही रा. मुंबई) अशी बुडताना वाचवण्यात आलेल्या पर्यटकांची नावे आहेत. रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीपुळे येथे देव दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. देवदर्शन आणि पर्यटनासाठी मुंबईहून आलेले अंश्शूमन पाठक आणि सोनू शेख हे दुपारच्या सुमारास तेथील समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाडू लागले. त्यांनी आरडा-ओरडा करताच त्यांचा आवाज ऐकून किनारी असणारे जिव रक्षक मयुरेश देवरुखकर, अजिंक्य रामाणे, आशिष माने, उमेश माने, अनिकेत चव्हाण, अनिकेत राजवाडकर, सुलभ चाक निखिल सुर्वे आणि वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांनी समुद्रात उड्या घेत दोन्ही बुडणाऱ्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले. जीवरक्षकांनी वेळीच समुद्रात उड्या घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार रमेश गावीत आणि पोलिस कॉस्टेबल निलेश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.