रत्नागिरी पोलिसांची सोशल मिडियावर करडी नजर

रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलिसांचा सोशल मिडियावर ‘वॉच’  आला आहे. पोलीस विभागाच्या सायबर शाखेतर्फे प्रसारित होणाऱ्या सर्व व्हॉट्सॲप व इतर माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पोस्ट यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. जो कोणी वादग्रस्त पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, अशा व्यक्तीविरुद्ध पोलीस विभागातर्फे अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या, अनुषंगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. त्याचप्रमाणे सोशल मिडियावर कोणत्याही प्रकारची, एखाद्या व्यक्तीची मानहानी अपमान, जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट कोणीही टाकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा प्रकरणी कारवाई झाल्यामुळे व प्रचलित कायद्यामुळे गुन्हा दाखल झाल्यामुळे भविष्यात व्यक्तीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकेल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की, सोशल मिडियावरती कोणतीही पोस्ट टाकताना अत्यंत खबरदारी घ्यावी व  भाषाशैली कोणाच्याही भावना दुखावणार नाही, अशा प्रकारची असावी, असे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे जमावबंदीचे आदेश लागू असल्याने बेकायदेशीरपणे गर्दी जमवू नये. कोणतेही राजकीय व इतर गर्दी जमवणारे कार्यक्रम असतील तर पोलीस विभाग व निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत रत्नागिरी यांच्या परवानगीशिवाय घेण्यात येऊ नयेत. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माईणकर यांनी केले