एमआयडीसी येथे गाड्यांचे शोरूम फोडणाऱ्या चोरट्याला गुजरातमधून अटक

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील टाटा व जागृत मोटर्सचे शोरूम फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला गुजरात येथून अटक करण्यात आली. एप्रिल २०२४ मध्ये ही चोरीची घटना समोर आली होती. मुरली उर्फ ॲलेक्स मनोहर पवार (२१, रा. उमरगांव, जि. वेलसाड, गुजरात) असे संशयिताचे नाव आहे.

ग्रामीण पोलिसात अरुण अशोक देशपांडे यांनी तक्रार दिली आहे. मिरजोळे एमआयडीसी येथे टाटा मोटर्स व त्याहून काही अंतरावर जागृत मोटर्सचे शोरूम आहे. ८ एप्रिल २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी टाटा मोटर्सच्या काचेच्या दरवाजाचे लॉक उचकटून आत प्रवेश केला. तसेच केबीनच्या ड्रॉव्हरमधील रोख रक्कम चोरून नेली. यानंतर काही अंतरावर असलेल्या जागृत मोटर्सच्या शोरूमकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला. जागृत शोरूमच्या खिडकीच्या स्लाईडींगच्या काचा सरक़वून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तसेंच आतील लॅपटॉप, मोबाईल व रोख रक्कम चोरुन नेली, अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली होती. दोन्ही शोरूमधील ६४ हजार रूपये रोख रक्कम, १० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप व मोबाईल चोरीला गेल्याचे नोंद करण्यात आले. चोरीप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.