रेल्वे आरक्षण १२० ऐवजी ६० दिवस आधी होणार

रत्नागिरी:- रेल्वेगाड्यांचे आरक्षण यापूर्वी १२० दिवस अगोदर होत होते. या नियमात रेल्वेप्रशासनाने बदल केला असून यापुढे ६० दिवस आधी रेल्वेगाड्यांचे आरक्षण होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार असल्याचे रेल्वेप्रशासनाने जाहीर केले आहे.

विशेषतः गणेशोत्सवातील आरक्षण यापूर्वी १२० दिवस आधी होत होते. आरक्षण खुले होताच गावी येण्यासाठी व जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांची आरक्षित तिकिटांसाठी एकच झुंबड उडत होती. यामुळे बऱ्याचवेळा प्रवाशांना प्रतीक्षा यादीवरीलच तिकिटे मिळून प्रवासाच्या नियोजनावर पाणीच फेरत होते. रेल्वे प्रशासनाने रेल्वे आरक्षणाच्या नियमात बदल करून आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांऐवजी ६० दिवसांवर आणून ठेवला आहे.

३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुढील १२० दिवसांसाठी आरक्षित केलेल्या तिकिटांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून ६० दिवसांच्या पुढील दिवसांचे आरक्षण थांबवले जावून नवीन कालावधीनुसार सुरू होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वेच्या नव्या निर्णयामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे आता सुलभ जाणार आहे. प्रतीक्षा यादीवरील तिकिटे प्राप्त झाल्यास नव्या पर्यायांचा अवलंब करणेही शक्य होणार आहे.