परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास 25 नोव्हेंबरपर्यंत मनाई

रत्नागिरी:- जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान शांततेने व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा, यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेवून फिरण्यास, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मनाई करण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचार संहिता दि. 15/10/2024 रोजी पासून लागू झालेली आहे. 263 दापोली, 264 गुहागर, 265 चिपळूण, 266 रत्नागिरी व 267 राजापूर या विधानसभा मतदार संघात दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे: आचार संहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यत अंमलात राहणार आहे.
आदेशात असे म्हटले आहे की, निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी तसेच मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे. निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार प्रभागामध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी पत्राव्दारे, प्रत्यक्ष संपर्क साधून जास्तीत जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात. त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आप आपली मोर्चे बांधणी सुरु केलेली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, वर्तमान पत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरुध्द टिका टिपणी करणे, सोशल मिडीयावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारीत करणे वगैरे कारणांवरुन राजकीय पक्षामधील किरकोळ स्वरुपाच्या वादाचे / आरोप प्रत्यारोपांचे एखादया घटनेत होवून तणाव निर्माण होवून त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उमेदवारांना मतदारांना घातक हत्यारांनी धाक धपटशा दाखविणे, तसेच प्रचारा दरम्यान क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे, बंदुका वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे, बंदुका (शस्त्र) बाळगणेस व बरोबर घेवून फिरणेस बंदी जारी करणे जरुरीचे आहे.

जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार दि. 18 ऑक्टोबर 2024 रोजी 00.01 वाजता पासून ते दि. 25 नोव्हेंबर 2024 चे 24.00 वा. पर्यतच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, मतदान शांततेने व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र मिळावे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेवून फिरण्यास, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीअबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मनाई केले आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.