लांजातील चोरीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

लांजा:- भरदिवसा फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने फ्लॅटमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची घटना गेल्या महिन्यात लांजा शहरात घडली होती. पोलीस तपासात या चोरीच्या घटनेचे धागेदोरे हाती लागल्याने या चोरीच्या घटनेचा लवकरच उलगडा होणार असल्याचे सांगण्यात आले.

शहरातील कोर्ले फाटा येथील भरवस्तीतील रॉयल पार्क या सदनिकेमध्ये रविवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३०च्या सुमारास ही चोरीची घटना घडली होती. या घटनेत चौरट्याने सोने, चांदी आणि रोख रक्कम अशा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला होना, शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या सदनिकेत दिवसाढवळ्या चोरी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित सदनिकेत व सदनिकेच्या आवारात सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडथळे आले होते. तसेच या तपासाकामी रत्नागिरी येथून रॅम्बो नावाच्या श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र तपासावेळी श्वान अर्ध्यावरच घुटमळले होते. एकीकडे संबंधित सदनिकेत व सदनिकेच्या आवारात सीसीटिव्ही नाही तर दुसरीकडे तपासासाठी आणलेले श्वानही काही वेळातच घुटमळल्याने लांजा पोलिसांसमोर या चोरीचा तपास करताना दुहेरी आव्हान उभे राहिले होते. दरम्यान, या चोरीच्या घटनेचे काही धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. त्यामुळे लांजा येथील रॉयल पार्क इमारतीमधील चोरीचा छडा लागण्याची शक्यता आहे.