रत्नागिरी:- शहरात घडलेल्या चार प्रसंगाशी माझा काही संबंध नसताना नाहक राजकीय करिअर धोक्यात आणण्याचे आणि मला गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोवंश हत्या, मुलीवर झालेल्या अत्याचार, वक्फ बोर्ड आणि संघाचे संचलन प्रकरण यामध्ये लक्ष्य करून माझ्याबाबत हिंदु समाजात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा मोबाईलचा सीडीआर तपासून पहावा. मी कोणत्याही प्रकरणात एकालाही फोन केलेला नाही. कोणाला पाठिशी घातल्याचे उघड झाले तर मी स्वत: थांबायला तयार आहे. परंतु या मागचा सुत्रधार शोधावा, अशी स्पष्ट भुमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडली.
मी हिंदु आहे आणि माझ्या धर्माबद्धल मला सार्थ अभिमान आहे. मात्र हा गैरसमज पसरवणे बंद व्हावे यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बोललो आहे. त्यांनी एसआयटी बसवून याची चौकशी करावी, परंतु बदनामी थांबविण्यासाठी संघाने भुमिका घ्यावी, असेही सामंत म्हणाले.
हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, आबा घोसाळे, दीपक पवार, आदी उपस्थित होते. ना.उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी एमआयडीसी परिसरामध्ये गोवंश हत्या प्रकरण उघड झाले. यामध्ये जो कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशा स्पष्ट सुचना पोलिसांना दिल्या होत्या. परंतु माझ्याकडे पुरावा आहे की मी या घटनेनंतर शांत बसलो नाही.
मी शंकराचार्यांना भेटलो आणि गोमातेला राज्यमाता करावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींना भेटून राज्याची भुमिका स्पष्ट करायला सांगितली. आज मला अभिमान आहे की, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यास यश आला. परंतु मला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला माझे हे उत्तर आहे. तसेच गोमातेसाठी रुग्णवाहिकाही सुरू केली जाणार आहे.
चंपक मैदानात एका तरूणावर झालेल्या अत्याचार प्रकरणी देखील मी पोलिसांना कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाचा यापूर्वीच खुलासा करणे आवश्यक होते. परंतु त्याबाबत जो अहवाल आला आहे, तो माPयाकडे आहे. मी तो देऊ शकत नाही. पोलिसांनी हा अहवाल पुढे आणला तर अनेकांचे डोळे उघडतील.
वक्फ बोर्डाबाबतही मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरविण्यात आला. परंतु हे वक्फ बोर्ड मी मंजूर केलेले नाही. २५ मे २०२३ ला मंत्री अब्दुल सत्तार यांनी ते मंजूर झालेआहे. त्यांचे कार्यालय देखील तेव्हा पासून सुरू आहे. मी फक्त कार्यालयाच्या अंतर्गत दुरूस्ती केली. त्याचे उद्घाटन केले. परंतु या वक्फ बोर्डाशी माझा काही संबंध नाही. एखाद्याचे राजकीय करिअर संपविण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यालयाबाबत तुम्हा शंका असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटु. परंतु खोटं,नाटं पसरवून प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करुन नका असे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या संचलनावेळी जी निदर्शने झाली, त्याबातही नाव न घेता मला लक्ष केले जात आहे. परंतु माझे आवाहन आहे की यामध्ये लाटीचार्जचा आदेश कोणी दिला, त्याची चौकशी कराच. या प्रकरणात माझ्या जवळच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होऊन देईन का? याबाबत मी बशिर मुर्तुझा, राजेश सावंत यांच्याशी बोललो आहे. पालकमंत्री म्हणून मी कोणताही हस्तक्षेप यात केलेला नाही. समाजात सलोखा रहावा, यासाठीच माझा प्रयत्न सुरू आहे. परंतु संघ परिवाराला विनंती आहे की मला बोलवून घेऊन याची माहिती घ्यावी, सीडीआर तपासावा. परंतु हे खालच्यापातळीवरील राजकारण थांबवावे, असे आवाहन सामंत यांनी केले.