कोकणनगर येथील प्रकार गैरसमजातून घडला

त्या’ घटनेवरून मुस्लिम बांधवांचे दोन्ही समुदायांना शांतता, एकोपा टिकवण्याचे आवाहन

रत्नागिरी:-  शहरानाजिक कोकणनगर येथे दिनांक ११ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेवरून समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करणे तसेच कोणत्याही प्रकारे धार्मिक तेढ किंवा गैरसमज वाढू नये, सोशल मीडियावर काही चुकीचे पोस्टर आणि व्हिडीओ वारंवार जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत, ज्यामुळे समाजात वाद निर्माण होण्याचा धोका निर्माण होण्याचा संभव आहे मात्र यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि समाजात शांतता, सुव्यवस्था आणि एकोपा अबाधित राहावा, तसेच नेमक्या घडलेल्या प्रकाराची स्पष्टता समाजासमोर येऊन चुकीच्या प्रचाराला आळा बसावा यासंदर्भात कोकण नगर परिसरातील मुस्लिम बांधवांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या पत्रकार परिषदेला मुफ्ती तौफिक सारंग, मुक्तसिर साखरकर, माजी नगरसेवक मुसा काझी, इलियास खोपेकर, रफिक मेमन, मौलाना इलियास बगदादी, सईद मुकादम उपस्थित होते.

गेल्या कित्येक वर्षांपासून कोकणातील हिंदू-मुस्लिम समाजाने गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव, देवीच्या मिरवणुका यांसारख्या सणांमध्ये मनोभावे सहभाग घेत सहकार्य केले आहे. दोन्ही समाजांतील बंधुभाव हा नेहमीच आदर्श राहिला आहे. कोकणनगर येथे घडलेल्या घटनेपूर्वी कधीही कोणताही वाद किंवा असंतोष निर्माण झालेला नाही. मात्र, 11 ऑक्टोबर 2024 रोजी शुक्रवारी, अशी परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे संभ्रम आणि गैरसमज पसरले.

दिनांक 11 ऑक्टोबर रोजी उर्दू शाळेच्या मैदानात आरएसएसची रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र या रॅलीच्या आयोजनाची कोणतीही पूर्व कल्पना स्थानिक ग्रामस्थांना देण्यात आली नाही. या रॅलीची पूर्वकल्पना स्थानिक ग्रामस्थांना दिली असती, तर निच्छितपणे आनंदाने या कार्यक्रमाचे स्वागत केले असते, जसे की, मागील सण-उत्सवांमध्ये हिंदू बंधूंसोबत मुस्लिम समाजाने नेहमीच सहभाग घेतला आहे. कोकणनगर येथील श्री महापुरुष मंदिराजवळील कार्यक्रमात देखील वर्षानुवर्षे शांततेने कार्यक्रम पार पाडले जातात, असे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

रॅली सुरू असताना, मुस्लिम बांधव संध्याकाळच्या नमाजेनंतर घराकडे परतत होते. मात्र, या रॅलीत लाठ्या, दांडे आणि बैंड बाजाचा समावेश पाहून घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिक आश्चर्यचकित झाले, कारण यापूर्वी अशा प्रकारची रॅली या परिसरात कधीही पाहण्यात आलेली नव्हती. योगायोगाने संध्याकाळच्या नमाजचे पठण करून स्थानिक नागरिक परतीच्या मार्गाने आपापल्या घरी जाण्याकरिता निघाले, याकरिता कोणत्याही प्रकारचा जमाव हा जाणीवपूर्वक जमवण्यात आला नव्हता तसेच या रॅलीला या जमावाकडून कोणत्याही प्रकारचा विरोध केला गेला नाही. मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये काही तरुणवर्ग सुद्धा उपस्थित होता ज्यांना या सगळ्या प्रकारचा कोणताही अनुभव किंवा पूर्वकल्पना नसल्यामुळे अकस्मात त्यांच्याकडून नारे लावण्यात आले. असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दगडफेकीचे आरोप खोटे

सर्व घटनाक्रम प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आला आहे. यामध्ये असे ही म्हटले आहे की, काही माध्यमांद्वारे रॅलीवर दगडफेक झाल्याचे दावे करण्यात आले, परंतु हे दावे पूर्णपणे चुकीचे आहेत. आमच्याकडे या घटनेचे व्हिडीओच्या स्वरूपात पुरावे आहेत, ज्यातून स्पष्ट होते की रॅली पूर्णपणे शांततेत पार पडली. या वेळी पोलिस कर्मचारीही उपस्थित होते, या पोलिसांनी रॅलीला सुरक्षिततेत पुढे नेले. मात्र, रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास, काही उपद्रवी व्यक्तींनी कोकणनगरमध्ये गोंधळ घातला आणि घरांवर दगडफेक केली. या घटनेचे देखील व्हिडीओ पुरावे उपलब्ध आहेत. मात्र पोलिसांनी तात्काळ या प्रकाराची दखल घेत कार्यवाही केली आणि एक मोठा अनुचित प्रकार घडण्यापासून पोलिसांनी थांबवला व वेळीच त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली.

अशा कार्यक्रमाचे स्वागतही करू

आम्ही सर्वांना हा शांती आणि सुव्यवस्थेचा संदेश देऊ इच्छितो की, यापुढे कोणताही वाढविवाद न होता सर्व समाजाने बंधुभावाने एकत्र राहावे. तसेच, सरकार आणि पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, भविष्यात अशा कोणत्याही कार्यक्रमाची माहिती स्थानिक प्रतिनिधींना वेळेवर कळवण्यात यावी, जेणेकरून कोणतेही गैरसमज किंवा अनुचित प्रकार होणार नाहीत. जेणेकरून कोणत्याही शांततापूर्ण आणि सामाजिक एकोपा कायम राहील तसेच अशा कार्यक्रमाचे स्वागतही करू अशी देखील भूमिका स्पष्ट केली आहे.

शांतता, एकोपा टिकवण्याचे आवाहन

समाजातील दोन्ही समुदायांना शांतता आणि एकोपा टिकवण्याचे आवाहन करण्यात आले. चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता, शांतीपूर्ण सहजीवनाचा आदर्श आपण पुढेही जोपासूया…जेणेकरून कोणताही वाद निर्माण होणार नाही आणि कोकणनगरमधील शांतता आणि एकोप्याचा संदेश सर्वदूर पसरेल असे आवाहन पत्रकार परिषदेतून मुस्लिम बांधवांनी केले आहे.