मत्स्य विभागाकडून नौका परवान्यांच्या कागदपत्रांची कसून तपासणी

रत्नागिरी:- सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छिमार नौकांच्या विविध परवान्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. 1 ऑगस्टपासून पारंपारिक आणि 1 सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाल्यापासून प्रथमच ही कागदपत्र तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला असून अडीच हजार पेक्षा अधिक मच्छिमार नौका मासेमारी करतात. 1 ऑगस्टपासून ट्रॉलिंग, गिलनेट म्हणजेच पारंपारिक मासेमारी सुरू झाली. त्याचबरोबर 1 सप्टेंबरपासून पर्ससीन नेट नौकांची मासेमारी सुरू झाली आहे. या दोन्ही प्रकारच्या मासेमारी सुरू झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे नौकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू झाली नव्हती. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त पदाचा कार्यभार आनंद पालव यांच्याकडे आल्यानंतर सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक असलेली ही तपासणी सुरू झाली आहे. परवाना अधिकारी बंदरावर आणि समुद्रात गस्ती घालून ही तपासणी करु लागले आहेत. मच्छिमार नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र, मासेमारी व बंदर परवाना यासह इतर अनेक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.