जि. प. शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात 104 कंत्राटी शिक्षकांची भरती

रत्नागिरी:- कंत्राटी शिक्षक भरतीबाबत गेले काही दिवस गोंधळ सुरू होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी हा विषय गंभीरपणे घेत ही भरती त्वरित सुरू करून स्थानिकांनाच प्राधान्य द्या. नाहीतर माझ्याशी गाठ आहे, असा सज्जड दम जि. प. प्रशासनाला दिला होता. त्यानंतर प्रशासन कामाला लागत दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यात 104 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले तर उर्वरित जणांना मंगळवारी देण्यात येणार आहे.

शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक किंवा डीएड-बीएड झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय 5 सप्टेंबर रोजी घेतला. त्यानुसार आदेश काढला गेला. कत्राटी तत्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधीत शिक्षकाला शासनाकडून महिन्याला 15 हजार रुपये हे मानधन मिळणार आहे. वर्षाला 12 रजा असणार आहेत. जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी, असे आदेशात म्हटले होते.
या आदेशाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत 25 सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय रद्द व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलन केले होते.
जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते त्याच अनेक शिक्षकांनी स्वत:च्या पत्नीचा अर्ज या भरती प्रक्रियेत दिला आहे. यामुळे हे वातावरण आणखी चिघळलं होतं.

जिल्ह्यात साधारण: 600 च्या आसपास रिक्त जागा आहेत. या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. परंतु आलेल्या अर्जांमध्ये परजिल्ह्यातील शिक्षकांच्या पत्नी तसेच परजिल्ह्यातील बेरोजगारांचे हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले होते.

ही प्रक्रिया कशी राबवावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. या मार्गदर्शन पत्रात उमेदवार हा स्थानिक असावा असे स्पष्ट म्हटलं आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा एक अर्ज आल्यास डीएड तसेच बीएड अर्हतेमध्ये अधिक गुण असणार्‍या उमेदवारांचा विचार करावा. रिक्त पदं असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधीत तालुक्यातील अर्ज करणार्‍या उमेदवाराचा विचार करण्यात यावा. तर तालुक्यात देखील उमेदवार मिळाला नाही तर जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार व्हावा असे या पत्रात म्हटलं आहे.
मात्र काही ठिकाणी पोलिस पाटील व सरपंचानी परजिल्ह्यातील उमेदवारांना रहिवाशी असल्याचा दाखला दिल्याने वादाचा प्रसंग निर्माण झाला. जि.प. प्रशासनानेसुद्धा सावध भूमिका घेत ही प्रक्रिया संथगतीने करण्यात सुरूवात केली. शेवटी स्थानिक डीएड बेरोजगारांनी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांच्या मार्फत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी झालेल्या चर्चेत पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधीत जिल्हा परिषद प्रशासनाला बोलावून दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करावी आणि स्थानिकांना त्यामध्ये संधी द्यावी, असा सज्जड दम दिला होता. प्रशासनानेसुद्धा लगेच यावर कार्यवाही करत सोमवारी पहिल्या टप्प्यात 104 जणांना नियुक्तीपत्र दिलं आहे. उर्वरित मंगळवारी देण्यात येणार आहे.