चिपळुणात वीज पडून शिक्षिका जखमी

चिपळूण:- सोमवारी सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाटासह वादळी पावसामुळे वीज पडून शिक्षिका जखमी झाल्याची घटना अडरे- मुकनाक बसथांबा येथे घडली. त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवले आहे.

लीना दीपक शिंदे (सती) असे या शिक्षिकेचे नाव आहे. शिंदे या जिल्हा परिषद आदर्श शाळा अनारी येथे सेवेत आहेत. सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना पाऊस आणि विजा कडाडत असल्याने त्या अडरे-मुकनाक बसथांबा येथे थांबल्या होत्या. काही वेळातच त्यांच्या अंगावर वीज पडून त्या भाजल्या. तसेच पडल्याने त्यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांना शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले. त्यांचे पती दीपक शिंदे हे शिक्षक असून ते कळकवैणे शाळेत कार्यरत आहेत. काही दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी मार्गताम्हाने मंडळात १२ मि. ‘मी., सावर्डे १४, वहाळ ३, शिरगाव ४, असुर्डे १२, चिपळूण १३, कळकवणे ७, खेर्डी १०, रामपूर २ मि.मी. पडला तर तालुक्यात ४४४९.२३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.