शाळांना 20 टक्के वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानावर सुरू असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 20 टक्क वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे 70 हजार कुटुंबाचं लक्ष लागल होतेे.
याबाबत मंत्रीमंडळ निर्णयाची प्रेस नोट नुकतीच महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली. संबंधित निर्णयाचा शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार आहे .मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलना 56 व्या दिवशी यश आले. 1 जून 2024 पासून अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय राहणार आहे.

शासनाने माहिती दिल्याप्रमाणे शासन निर्णय 6/2/23 अन्वये विहित निकषांची पूर्तता केलेल्या 820 प्राथमिक शाळा,3513 वर्ग/तुकड्या व त्यावरील 8602 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, 1984 माध्यमिक शाळा, 2380 वर्ग/तुकड्या,व त्यावरील 24028 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,3040 उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये,3043 वर्ग/तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील काम करणारे 16932 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला आहे.

काही प्राथमिक,माध्यमिक शाळा 20%, 40, 60 टक्के वेतन अनुदानावर सुरू आहेत तर काही उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालये 20 टक्के व 40 टक्के अनुदानावर सुरू आहेत. अनुदानाच्या विविध टप्प्यावर असलेल्या शाळांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आला आहे.यासाठी होणार्‍या वार्षिक रु 935.43 कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.12/02/2021,15/02/2021 नुसार अपात्र झालेल्या पण 30 दिवसाच्या आत त्रुटी पूर्तता केलेल्या 40% व 60 टक्के अनुदासाठी पात्र ठरलेल्या 651 प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा, निष्ठ महाविद्यालये व 1281 तुकड्यावरील 5990 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी होणार्‍या रु 107.10 कोटी आवर्ती खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. निर्णयाअंती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल राज्यातील शिक्षकांकडून आभार व्यक्त होत आहेत. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

अनुदानाचा पुढचा टप्पा वाढवून मिळण्याच्या पाठपुराव्यात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदर किशोर दराडे, आमदार किरण सरनाईक, आमदार ज. मो. अभ्यंकर, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, अ‍ॅड. तुकाराम शिंदे, शिक्षक समन्वय संघाकडून प्रा राहुल कांबळे, प्रा. अनिल परदेशी, प्रा. संतोष वाघ, प्रा कर्तारसिंग ठाकूर, प्रा. गजानन काकड, प्रा भारत जामनिक, प्रा. रत्नाकर माळी, प्रा. चंद्रकांत बागणे, प्रा. भारत शिरगावकर, प्रा. संघपाल सोनोने, प्रा. सुशील रंगारी, के. पी पाटील, सौ. नेहा गवळी, प्रा. सदानंद बानेरकर आदींसह अनेकांनी आपले योगदान दिले.