रत्नागिरी:- पीडब्ल्यूडीव्ही अॅक्ट 2005 च्या कलम 10 मधील तरतुदीनुसार कष्टकरी रयत सेवा संस्था संचलित महिला व मुलांकरीता असलेल्या विशेष सहाय्य कक्षाची सन 2010 मध्ये स्थापना करण्यात आली. मागील 14 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचाराची 1985 व इतर 215 प्रकरणे नोंदवली गेली त्यातील जवळपास 85 टक्के प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली.
महिला व बाल विकाल विभागाच्या शासननिर्णयानुसार पोलिस अधीक्षकांच्या संनियंत्रणाखाली रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात हे महिला कक्ष स्थापन करण्यात आले. 2010 ते 2024 या 14 वर्षांच्या कालावधीत आजपर्यंत तेथे जवळपास 2000 प्रकरणे नोंद केली गेली आहेत. यात शारीरिक मानसिक, लैंगिक, शाब्दिक किंवा आर्थिक छळ, हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला अपमानित करणे, शिवीगाळ करणे, विशेषतः अपत्य नसल्यामुळे तिला हिणवणे किंवा धमकावणे अशाप्रकारच्या अत्याचार पिडित महिला व 18 वर्षाखालील मुलांना सेवा आधारगृह सेवा कौंटुंबिक समुपदेशन न्यायालयीन सेवा, आरोग्य, पोलिस मदत कौंटुबिक हिंसाचार प्रतिबंध, पोक्सो कायदेविषयक सेवा इ. विनामूल्य पुरविल्या जातात.
महाराष्ट्र शासनाच्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यानुसार पीडित महिलेला पुढील कार्यवाहीसाठी स्वतः निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क असून, कोणत्याही प्रकारचे एकत्र समुपदेशन तिच्या अनुमती नंतरच करण्यात येते. भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था रत्नागिरीचे समुपदेशक पवनकुमार मोरे आणि छाया कोकरे यांनी या कुटुंबांना मार्गदर्शन केले आहे. यासाठी महत्त्वाची भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या सनियंत्रणाखाली राबवण्यात आली.
या कक्षाद्वारे पीडित महिलेला विधी सेवा प्राधिकरणाची मदत मिळवून देण्याकरीता जवळपास 70 प्रकरणे संरक्षण अधिकार्यांकडे सोपवली. तसेच 110 पीडित महिलांची सखी वन स्टॉप सेंटर येथे तात्पुरत्या निवार्याची सोय केली. जवळपास 180 जनजागृती कार्यक्रम राबवून शाळा, महविद्यालये ग्रामसभा, महिला बचत गट व इतर शासकीय यंत्रणांमधील महिला पुरुष व मुलांना कक्षाची व महिला आणि मुलांविषयक कायद्यांची माहिती दिली आहे