रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंतांना उमेदवारी द्यायची की अन्य पक्षातून आयात करणाऱ्याला संधी द्यायची, याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शनिवारी महत्त्वाची बैठक रत्नागिरीत होणार आहे. उबाठाचे नेते विनायक राऊत याबाबत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकणार आहेत. परंतु अनेक पदाधिकाऱी निष्ठावंतांना संधी देण्यावर ठाम असल्याने उबाठातून उमेदवारीची संधी शोधणाऱ्यांचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सलग ४ टर्म निवडून येणाऱे उद्योग मंत्री उदय सामंत या तगड्या नेत्याला टक्कर देणारा कोण उमेदवार द्यावा, याबाबत उबाठामध्ये चाचपणी सुरू आहे. उबाठामध्ये सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने या दोघांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी उदय बने या निष्ठावंताबाबत अनेकांचे एकमत आहे. मातोश्रीवरून आलेला आदेश त्यांना शिरसावंद्य आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून अनेक पदे त्यांनी सोडली. पक्षाशी त्यांची निष्ठा कामय राहिली.
परंतु आता राजकीय परिस्थिती अशी आहे की सामंत यांना शह देण्यासाठी तेवढाच तगडा उमेदवार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. महायुती असल्यामुळे ही जागा शिवसेनेच्याच पदरात पडणार आहे. परंतु गेली दोन ते तीन वर्षे भाजपकडून इथे आपल्याला उमेदवारी मिळेल ही अपेक्षा धरून काम करणारे भाजपचे माजी आमदार बाळ माने उमेदवारीसाठी उबाठात जाण्याची चर्चा सुरू होती. ते मातोश्रीवर गेल्याचेही बोलले जाते. परंतु त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. या सर्व राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमिवर आज (ता. ५) उबाठाची महत्त्वाची बैठक होणार आहे. विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱी याला उपस्थित राहणार आहेत. निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवार द्यायची की, बाहेरून येणाऱ्याला द्यायची यावर चर्चा होणार आहे. बाहेरून आलेल्याला उमेदवारी दिली तर सर्व पदाधिकारी काम करतील का, याचीही चाचपणी केली जाणार आहे. परंतु २०१४ चा अनुभव गाठिशी असल्याने अनेक शिवसैनिक आपल्याच पक्षातील निष्ठावंताला उमेदवारी देण्यावर ठाम आहे. तसे झाले तर अन्य पक्षातून येणाऱ्यांची दारे बंद होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.