४८७ ठिकाणी मूर्तीस्थापना; अनेक ठिकाणी दांडीयाचे आयोजन
रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू होणार आहे. गुरुवारी घरोघरी घटस्थापनेनंतर जिल्ह्यात ४२५ ठिकाणी दूर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना ६२ ठिकाणी फोटो पूजन, घरोघरी खाजगी तर काही ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी गरबाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस जिल्ह्यात दांडीया आणि गरब्याची ‘धूम’ सुरू राहणार आहे.
कोकणामध्ये पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरांपुरताच घटस्थापना करण्यापर्यंत उत्सव मर्यादीत होता. मात्र ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना करून, दांडीयाचे कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा मागील काही कालावधीपासून वाढीस लागली आहे. काही भागांमध्ये मात्र ग्रामदेवतांच्या मंदिरासमोरच हा उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. शहरांमध्ये मात्र गल्लोगल्ली व काही भागांमध्ये उत्सव साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात ४२५ ठिकाणी सार्वजनिक तर ६२ खासगी ठिकाणी देवींच्या मुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. ९० ठिकाणी देवीच्या फोटोंचे पूजन करून, दांडीया कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन होणार असून ३६ हजार ६२९ ठिकाणी खाजगी तर १७४ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना केली जाणार आहे. गरब्याचे आयोजन प्रामुख्याने गुजराथी वस्ती असणाºया ठिकाणीच मोठ्याप्रमाणात होत असल्याने जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह काही पंचक्रोशींच्या ठिकाणीही असे कार्यक्रम केले जाणार आहेत. रत्नागिरी शहरातदेखील मागील काही वर्षात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. नवरात्र उत्सव मंडळांसह अनेक ठिकाणी दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याने या उत्सवाची रंगत आणखी वाढत आहे. दांडीया स्पर्धेत विशेष करून युवा पिढीचा सहभाग अधिक असल्याने राजकीय मंडळीदेखील या उत्सवाचा राजकीय फायदा करून घेण्यास पुढे सरसावलेले दिसून येतात.