रत्नागिरी नगर परिषदेतील तीन अधिकार्‍यांच्या बदल्या

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतील तीन अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. रनपमध्ये आधीच अनेक अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत, त्यात या तीन अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्याने राहिलेल्या अधिकार्‍यांवर आणखी अतिरिक्त कार्यभार येणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांची चिपळूण नगर परिषदेत बदली झाली. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांची खोपोली नगर परिषदेत बदली झाली. त्यांच्याकडे रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागासह आरोग्य विभागाचा कार्यभार होता. मालमत्ता विभागातील अधिकारी नंदकुमार पाटील यांची गडहिंग्लज येथे बदली झाली आहे. त्यांच्याकडे मालमत्ता विभागासह पाणीपट्टी वसुली विभागाचा कार्यभार होता. रत्नागिरी नगर परिषदेत अधिकारी, कर्मचार्‍यांची अनेक पदे रिक्त आहेत. अनेक विभागांचा कार्यभार कंत्राटी कामगार सांभाळत आहेत.