गणपती विसर्जनासाठी मांडवी पेक्षा भाट्ये समुद्र किनाऱ्याला अधिक पसंती

रत्नागिरी:- गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनार्‍याला यावर्षी मांडवीपेक्षा अधिक पसंती मिळाली. गेल्यावर्षीपर्यंत मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी रात्री उशीरापर्यंत तुडुंब गर्दी असायची. मात्र यावर्षी रात्री 8 वाजल्यानंतर मांडवी समुद्रकिनार्‍याजवळ गेल्यावर्षीच्या तुलनेत फारच कमी गर्दी अनुभवण्यास मिळाली.

मांडवी समुद्रकिनारी दरवर्षी विसर्जन सोहळ्याला मोठी गर्दी होते. त्यानुसार पोलिसांकडून विसर्जन मार्ग आणि वाहन पार्किंगचे काटेकोर नियोजन केले जाते. यावर्षीही असेच नियोजन असल्याने गणेशभक्तांनी विसर्जन सोहळ्यासाठी भाट्ये समुद्रकिनार्‍याला पसंती दर्शवली. त्यामुळे मांडवीपेक्षा भाट्ये समुद्रकिनार्‍यावर रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणुका आणि भक्तांची गर्दी अधिक होती.

मांडवी समुद्रकिनार्‍यावर जाण्यासाठी फारच अरुंद रस्ता असल्याने दरवर्षी भूते नाक्यापासून समुद्रकिनार्‍यापर्यंत मिरवणूक पुढे करताना बंदोबस्तातील पोलिसांची दमछाक होते. समुद्राकडे जाणार्‍या मिरवणुका आणि विसर्जन करून येणार्‍यांची गर्दी झाल्याने अरुंद रस्त्यावर फारच धक्काबुक्की व्हायची. परंतु भाट्ये समुद्रकिनार्‍यापर्यंत जाण्यासाठी पुरेसा रस्ता असल्यानेच विसर्जनासाठी भाट्ये समुद्रकिनार्‍याला यावर्षी मांडवीपेक्षा अधिक पसंती मिळाल्याचे सांगितले जात आहे. भाट्ये किनारी वाहनांचे पार्किंग करणेही सोपे जाते.