रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरयाच्या जायघोषात…. ढोल ताशां चागजर सोबत फुलांची उधळण.. करीत कर्ले-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही मिरवणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पडली.
मागील 38 वर्षापासून कर्ला-आंबेशेत गावातील घरगुती गणरायांची मिरवणूक वाजतगाजत शहरामधून गावापर्यंत काढण्यात येते. यावर्षी ३९ वे वर्ष असून अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने शांततेत ही मिरवणूक निघते. विशेष म्हणजे ही मिरवणूक मोहल्ल्यातून जात असल्याने या मिरवणुकीला विशेष महत्व आहे. या मिरवणुकीत जवळपास 120 गणेशमुर्ती होत्या. ढोल-ताशा पथकांसह, झांजपथक, कर्ला येथील गणराज मित्रमंडळाचे महिला लेझिम पथक, बेळगाव येथील बागलकोटचे बॅण्डपथक, शिवशक्ती चक्रीभजनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. सकाळी 9.30 वा. कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूकिला श्रीफळ वाढवून सुरुवात झाली. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे, शेखर घोसाळे, मुन्ना घोसाळे, किरण भाटकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यात सहभागी झाली होती. जवळपास चार ते पाच तास ही मिरवणूक चालली.
शहरातील स्वा. सावरकर चौकातून सुरु झालेली ही मिरवणूक गोखले नाका, रामनाका मार्गे एसटी स्टॅण्ड, जयस्तंभ, शासकीय रुग्णालयमार्गे, निवखोल, कर्ला, आंबेशेत अशी काढण्यात आली.
या मिरवणुकीत गणेशभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच पुष्पवृष्टी करण्यासाठी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी उपस्थिती लावली होती.
या मिरवणुकी दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी तीन वाजता ही मिरवणूक कर्ला- आंबेशेत येथे दाखल झाली.