अडीच हजार शाळांमध्ये बसणार सीसीटीव्ही

रत्नागिरी:- बदलापूर येथे शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनस्तरावरही याची गंभीर दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील २ हजार ४०० जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. त्या संदर्भात प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.

शासनाने आता सर्व शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्हीवर होणारा खर्च जिल्हा नियोजनमधून करावा, असे आदेश आहेत. खासगी शाळांमध्ये महिन्याच्या आत हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत तर कारवाई करण्याचां इशारा शासनाने दिला आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासन सध्या ॲक्शन मोडवर आले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २१ ऑगस्टला शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.