रत्नागिरी:- गेले दीड महिने रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात 97 शाळांमधील 812 जागांसाठी 570 जणांना लॉटरी लागली होती. यापैकी 21 अर्ज अपात्र करण्यात आले. मुदतीत 488 जणांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र त्यानंतर या मुदतवाढ देण्यात आली. त्यामध्ये 31 जणांनी प्रवेश केला आहे. यामुळे आता एकूण 519 जणांचा अंतिम प्रवेश निश्चित झाला आहे. तर 293 जागा रिक्त राहणार आहेत.
शिक्षण विभागाने दि. 7 जून रोजी आरटीईची ऑनलाइन सोडत काढण्यात आली होती. परंतु, काही खासगी शाळांनी आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली. तसेच काही शिक्षक संघटनांनी आरटीई कायद्यातील बदल रद्द करावा, याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी आणि निकाल देण्यास विलंब झाल्याने प्रवेशप्रक्रिया एक ते दीड महिन्यापासून रखडली होती.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 570 जणांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली होती. प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही 61 जणांनी प्रवेश घेतलाच नाही तर 21 अर्ज अपात्र करण्यात आले. यामुळे 488 जणांनी अंतिम प्रवेश घेतला होता; मात्र, शासनाने पुन्हा 29 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदतवाढ दिली होती. यानंतर 31 जणांनी प्रवेश घेतला आहे. यामुळे एकूण 519 जणांचा प्रवेश निश्चित झाला आहे.