लोकप्रतिनिधींनी कामाचा अहवाल जनतेला सादर करणे आवश्यक: नाना पाटेकर

पालकमंत्री उदय सामंत यांचा ‘उदयपर्व’ कार्यअहवाल प्रकाशित

रत्नागिरी:- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा अहवाल जनतेला सादर करणे आवश्यकच आहे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांचा गेल्या पाच वर्षांतील कामाचा कार्यअहवाल उदय पर्व या नावाने शनिवारी प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी श्री. पाटेकर बोलत होते.

ते म्हणाले, मी या कार्यक्रमाला यायच्या आधी उदयला सांगितले होते की तू अहवाल प्रसिद्ध करत असशील आणि त्यातील एक जरी गोष्ट मला खोटी आढळून आली, तर मी त्यावर जाहीररीत्या बोलेन आणि ते चालणार असेल तर मला कार्यक्रमाला बोलाव. त्याने अहवालाची चित्रफीत बनवून घेतली. असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकाने जनतेला सादर करायला हवा. विरोधी पक्षालासुद्धा आम्ही मते दिली, म्हणून ते विरोधी पक्षाचे नेते झाले. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या कारकिर्दीत काय केले, हे लोकांना कळायला हवे. हे केवळ उदयपुरते मर्यादित राहता कामा नये. कारण सरतेशेवटी तुम्ही सर्व आमच्यासाठी आहात.

वरिष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यावेळी म्हणाले, रत्नागिरी हे कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर आहे. मनाची श्रीमंती, चांगले आचारविचार एकत्र येतात, तेव्हा खूप काही चांगले घडते. शिक्षणातून रत्नागिरीचा विकास होणार हे बरोबर हेरून उदयजींनी आपण रत्नागिरीत विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण हेच भवितव्य घडविते. नाना आणि मी महा पालिकेच्या मराठी शाळेत शिकलो. पण मराठीत शिकल्याने दोघांचेही काही अडले नाही. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ज्या समाजात शिक्षकाला प्रतिष्ठा नाही, त्या देशाचा विकास होऊ शकत नाही.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे म्हणाले, मी राजकीय कार्यक्रमांना जात नाही. मी चित्रपट पाहत नाही. मात्र उदय याने प्रेमळ धमकी दिल्याने मला यावे लागले. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगतो की उदय आमच्या आनंदवनात आला होता. त्याने तेथील कुष्ठरोग्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्या सोडविण्याचा मनोमन प्रयत्न केला. त्यासाठी अधिकाऱ्यांना सातत्याने आनंदवनात धाडले आणि सातत्याने त्याच्याकडून आमच्या या आनंदवनातील कुष्ठरोग्यांसाठी मदत होत आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. उदयला सामाजिक भान खूप चांगले आहे, असेही आमटे म्हणाले.

श्री. सामंत म्हणाले, दिग्गजांच्या हस्ते माझ्या कार्य अहवालाचे प्रकाशन होते आहे. हा मोठा सन्मान आहे. भाग्याचा क्षण आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर माशेलकर यांच्या माध्यमातून नवे शैक्षणिक धोरण राज्यात आणले गेले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे, नाना यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले. यापुढेही असेच काम करीन.

यावेळी व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर, उद्योजक गद्रे, ज्येष्ठ उद्योजक तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे वडील अण्णा सामंत, भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी १०० वर्षे कार्यरत भारत शिक्षण मंडळाला २५ लाख, सव्वाशे वर्षांपासून कार्यरत श्री मारुती गणपती पिंपळ पार ट्रस्टच्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळाला १० लाख, तर अखिल भारतीय नाट्य परिषदेला २५ लाखाचा धनादेश देण्यात आला. तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनलाही धनादेश प्रदान करण्यात आला.

रत्नागिरीतील विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनानी आपल्याला भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. एमआयडीसीच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने अशी भवने उभारण्यासाठी रत्नागिरीत दहा भूखंडाचे १० सामाजिक संस्थांना मोफत वितरण करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.