रत्नागिरीत महाविकास आघाडीची निदर्शने

रत्नागिरी:-  मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. आज रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मारुतीमंदिर येथे निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी मारुतीमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यातच पडला. त्याचा सर्वांनी निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जोरदार घोषणाही यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, महिला उपजिल्हा संघटक ममता जोशी, तालुका संघटक साक्षी रावणंग, शहर संघटक मनिषा बामणे, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये म्हणाले की, राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यातच कोसळला. त्याबददल सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही याठिकाणी आज उपस्थित आहोत. सरकारने दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विलास चाळके यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यातच पडतो, याचा अर्थ हे सरकारच भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचारी अशीच या सरकारची ख्याती आहे. ५ कोटी खर्च केले, त्यामध्ये कितीचा भ्रष्टाचार झाला? या संपूर्ण घटनेची चौकशी होऊन भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यावेळी म्हणाले की, राजकोट किल्ल्यावर घडलेली ही घटना अशोभनीय आहे. सरकारने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे. सरकारने हे जनतेचा अपमान करण्याचे थांबवले नाही तर सरकारला सळो की पळो करुन सोडू, असे त्यांनी सांगितले. महिला तालुका संघटक साक्षी रावणंग यावेळी म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले आज साडेतीनशे चारशे वर्षांनंतरही अबाधित आहेत. पण या केंद्र आणि राज्य सरकारने बांधलेले रस्ते, पूल आणि महापुरुषांचे पुतळे कोसळत आहेत. हा सगळीकडे भ्रष्टाचाराचा भस्मासूर पसरलेला असल्याची टीका रावणंग यांनी केली.