मिर्‍या एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हाच हेतू: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- मिर्‍या येथील एमआयडीसीबाबत गैरसमज पसरवले जात आहेत, नाहक घाणेरडे राजकारण केल जात आहे. मिर्‍यावासियांना एमआयडीसी नको असेल तर होणार नाही, मात्र त्यांनी नेमक काय होणार आहे हे जाणून घ्यावे, मला काय त्या ठिकाणी माझ्यासाठी ताजमहाल उभा करायचा नाही. फक्त स्थानिकांना रोजगार मिळावा हाच हेतू आहे. मात्र रत्नागिरीत काही लोकांनी उदय सामंतची बदनामी करण्याचा विडा उचलला असल्याच्या भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.

टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड व एमआयडीसीच्या माध्यमातून कौशल्यवर्धन केंद्र उभारले जात असून, त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. शिरगाव एमआयडीसीतील स्टरलाईटच्या जागेत हे भूमिपूजन पार पडले. येत्या सहा-सात महिन्यात ट्रेनिंग सेंटर उभे राहणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीतील तरुण नोकरीसाठी यापुढे बाहेर जाता कामा नये यासाठीच आपले प्रयत्न सुरु आहेत. येत्या आठ दिवसात रत्नागिरी तालुक्यात एक हजार एकरवर प्रकल्प येत आहे. हा प्रदूषणकारी प्रकल्प नाही. यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे डिफेन्स क्लस्टरसंदर्भात नुकताच एमओयु करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पही होणार आहे.÷ त्यामुळे येथील तरुणांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार आहे. रोजगार पाहिजे असेल तर एमआयडीसी येणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

मिर्‍या येथे जाकीमिर्‍या व सडामिर्‍या येथे औद्योगिक वसाहत आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र तेथे नेमके काय होणार आहे हे जाणून घेण्यापूर्वीच काहीजण विरोध करीत आहेत. रोजगाराबाबत कोणी राजकारण करु नये असे मतही त्यांनी व्यक्त केले. मिर्‍या परिसरातील ग्रामस्थांनी आमची घरे, मंदिर, मंदिराच्या जागा या औद्योगिक वसाहतीत येणार नाहीत याची दक्षता घ्या म्हणून सांगितले. त्याप्रमाणे या सर्व गोष्टी सोडण्यात आल्या. सडामिर्‍या व जाकीमिर्‍याच्या मोकळ्या डोंगरावर हा प्रकल्प होणार आहे. मात्र त्यातही काहीजण राजकारण आडवे आणत आहेत. मला कुणावरही जबरदस्ती करुन प्रकल्प आणायचा नाही, असे स्पष्ट करतानाच मला जागा घेऊन याठिकाणी ताजमहाल बांधायचा नाही असे उद्गारही ना. सामंत यांनी काढले. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यानेच काहीजण पुढाकार घेत विरोध करीत आहेत. जे विरोध करीत आहेत, ते मिर्‍या येथील त्या जागेवर गेले होते का असा प्रश्नही उपस्थित करीत त्यांनी नागरिकांच्या विरोधात जाऊन काम करणार नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी एमआयडीसीचे सहमुख्यकार्यकारी अधिकारी भंडारी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, टाटा टेक्नॉलॉजीचे पुष्कराज कौलगुड, रवी राठोड, प्रितम गंजेवार, एमआयडीसचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता भांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिरगाव सरपंच फरीदा काझी, उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, परेश सावंत, शकील मोडक, वंदना खरमाले, सचिन राक्षे, बी.एन. पाटील आदी उपस्थित होते.


या टाटा प्रशिक्षण सेंटरसाठी एक एकर जागा देण्यात आली असून, याठिकाणी 191 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यात 160 कोटी टाटा कडून तर 36 कोटी एमआयडीसीकडून निधी दिला जाणार आहे. दरवर्षी 1560 प्रशिक्षणार्थींना 17 विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पदवी, पदवीका, आयटीआय ही शैक्षणिक पात्रता त्यासाठी आवश्यक आहे.