राजापूर:- कोकण परिसराला घाटमाथ्याशी जोडणारा आणि शॉर्टकट मार्ग म्हणून वाहनचालकांच्या पसंतीस उतरलेल्या अणुस्कूरा घाटामध्ये शनिवारी पहाटेच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली. घाटातील पिकनिक स्पॉटपासून वरच्या बाजूला काही अंतरावर ही दरड कोसळली आहे. त्यामुळे अणुस्कूरा घाटातील वाहतुक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्याचे कालपासून कसोशीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठमोठे असलेल्या दगडांमुळे रस्ता मोकळा करण्याच्या कामामध्ये साततत्याने व्यत्यय येत आहे. त्यामुळे घाटरस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर ठाकले आहे.
जेसीबी आणि तीन डंपरच्या सहाय्याने घाटमार्ग मोकळा करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यामध्ये मोठमोठ्या असलेल्या दगडांमुळे आज पूर्णपणे वाहतूकीसाठी रस्ता मोकळा होण्याची शक्यता कमी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत एकाबाजूने रस्ता वाहतूकीसाठी मोकळा होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणामुळे मुंबईतून कोकणात येणारी वाहने पुणे मार्गे अणुस्कूरा घाटातून कोकणात येण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्याचवेळी गोव्याला जाणार्या पर्यटकांकडूनही याच रस्त्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यातून, नागमोड्या वळणांचा आणि उताराचा असलेल्या अणुस्कूरा घाटमार्गातून सातत्याने मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. आज पहाटे 5 वा.च्या दरम्यान घाटामध्ये दरड कोसळली. त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्यासह मोठमोठे दगड रस्त्यामध्ये येवून रस्ता पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे घाटमार्गातील वाहतूक पहाटेपासून ठप्प झालेली आहे. त्याऐवजी घाटमाथ्यावर जाण्यासाठी वा तिकडे कोकणात येण्यासाठी अन्य पर्यायी मार्गांचा वाहन चालकांकडून उपयोग केला जात आहे.
दरम्यान, बंद झालेला घाटमार्ग मोकळा करण्यासाठी सकाळपासून बांधकाम विभागाकडून तात्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यामध्ये जेसीबी आणि तीन डंपरच्या सहाय्याने माती बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठमोठे दगड असल्याने रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये अडथळे येत आहे. रस्त्यामध्ये आलेले दगड ब्रेकरच्या सहाय्याने फोडण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.