माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम गुंडाळण्याचा प्रयत्न?

शिक्षण वर्तुळात नाराजी

रत्नागिरी:- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम घेण्यासाठी कमी कालावधी देऊन मूल्यांकन करने म्हणजे उपक्रम गुंडाळण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे दिसतो. उपक्रम घाईघाईने घेण्यामागचा नेमका उद्देश काय? असा सवाल उपस्थित होत असून याबाबत शिक्षण वर्तुळात नाराजी पसरली याहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचा टप्पा क्र. 2 शासन निर्णय 26 जुलै 2024 रोजी घेण्यात आला. त्यानंतर शाळा रजिस्ट्रेशन दि. 4 ऑगस्ट 2024 पर्यंत करून दि.5 ऑगस्ट 24 ते 4 सप्टेंबर 24 शाळास्तरावर कार्यवाही पूर्ण करुन दि. 5 सप्टेंबर 2024 नंतर केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णयात नमूद आहे. मात्र शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या दि. 19 ऑगस्टच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे जिल्हास्तरीय मूल्यांकन दि. 28 पर्यंत संपवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

पवित्र प्रणाली शिक्षक भरती दि. 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याबाबत खासगी संस्थांना आदेश असून, संस्था व शाळास्तरावर याबाबत कार्यवाही सुरु आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमावर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम घाईघाईत उरकण्याचा शासनाचा नेमका हेतू काय? असा शिक्षक व संस्थांना प्रश्न निर्माण झाला आहे. हा उपक्रम सुंदर आणि स्तुत्य असून, तो घाईगडबडीत न घेता काही कालावधीने राबवला गेल्यास या उपक्रमाचे फलित होईल, असे मत व्यक्त शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.