रत्नागिरी:- या महाराष्ट्रात मुलीबाळींकडे डोळे वटारून बघू नका.. असे कृत्य सहन केले जाणार नाही… असे ठणकावून सांगत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना विरोधकांना पोटदुखी ठरल्याने बदलापूरचे राजकारण करत महिलांना भडकवण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही दिलेला शब्द पाळतो. ही लेना बँक नसून देना बँक आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला फटकारले. ते रत्नागिरी येथील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या वचनपुर्ती सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
बुधवारी रत्नागिरीत मुख्यमंत्री लाडकी बहिण वचनपुर्ती सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला महिला बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आ. शेखर निकम, आ. रविंद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, सिंधुरत्न योजनेचे किरण सामंत यांच्यासह कोकण रेंजचे आयजी संजय दराडे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांनी टीका केली, त्यांच्या पोटात पोटशूळ उठले. ही योजना म्हणजे चुनावी जुमला, असे आरोप केले. योजना बंद पडेल, अशी भाकिते केली, मात्र मायचा लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
ते पुढे म्हणाले की, राज्यात उद्योग येतात, परदेशी गुंतवणूक मिळते, त्यामुळे लाडकी बहीण दीड हजारांवर थांबणार नाही, या योजनेचे पैसे जमा होताच अनेकांचे चेहरे काळेकुट्ट झाले. बुरी नजर वाले, तेरा मुह काला, हसे म्हणत परिस्थिती बदलली तर दीडचे तीन हजार होतील… असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या योजनेसाठी ३३ हजार कोटींची तरतूद राज्य शासनाने केली आहे. तुमचा भाऊ माहेरचा आहेर वाढवणार आहे. मला माझ्या भगिनी लखपती झाल्याचे पहायचेय. आमची लेना बँक नसून देना बँक असल्याचे सांगून त्यांनी विरोधकांवर टीका केली.
आम्ही दिलेला शब्द पाळतो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, तुमचा सख्खा भाऊ कोण आणि सावत्र भाऊ कोण हे तुम्हाला कळंलं असेल. ही योजना लागू होताच अनेकांना मळमळ होऊ लागली, काहींना उलट्या होऊ लागल्या. म्हणून काहीजण कोर्टात गेले, मात्र कोर्टानेही त्यांना फटकारलं. हे पैसे मिळू नयेत म्हणून काहीजण विरोधात होते आणि आता विरोधकच या योजनेचा बोर्ड लावतायत आणि श्रेय घेतायत, अशी टीका त्यांनी केली.
महिला ही झाशीची राणी आहे… तिच्या वाट्याला जाल तर जळून खाक व्हाल. राज्य शासनाने दिलेली ओवाळणी नाही तर कायमचा माहेरचा आहेर आहे. ही ओवाळणी कायमच मिळत राहणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
लोकसभेला खोटं नरेटीव्ह पसरवलं… आता सर्व सावध झाले आहेत. विरोधकांनी बहिणींच्या प्रतिक्रिया यापुढे कान उघडून ऐकाव्यात. कोण सख्खा भाऊ आणि कोण कपटी भाऊ? हे बहिणी ओळखून आहेत, असेदेखील ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तुमच्या पापाचा घडा भरला आहे. योग्य वेळी याच महिला तुम्हाला उत्तर देणार आहेत. अर्थव्यवस्थेला चालना महिलाच देऊ शकतात. महिला सक्षम तर देश सक्षम व महिलाचा विकास तरच देशाचा विकास, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री झालो तेव्हाचा आनंद आणि राज्यातील महिलांना एक भाऊ म्हणून जी योजना अमलात आणली ती योजना सुरू झाल्यानंतर झालेला आनंद हा खरा आनंद आहे. हे आपले कायमचे ऋणानुबंध आहेत. संसाराचा गाडा चालवताना महिलांना कसरत करावी लागते, मात्र ही कसरत आता थांबणार आहे.
आईला काटकसर करताना पाहिलंय
मीदेखील तुमच्यासारखाच एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझं कुटुंब शेतकरी कुटुंब होतं. माझ्या आईने केलेली काटकसर मी पाहिली आहे. माझ्या पत्नीनेदेखील काटकसर केलेली मी पाहिलीय. एक महिला काटकसर करून कसा संसार करते हे या भावाला चांगलेच माहितीय. त्यामुळे माझ्या बहिणींनो तुम्ही निश्चिंत रहा, असे त्यांनी उपस्थित माता भगिनींना सांगितले.
तुफान गर्दी
या कार्यक्रमासाठी प्रशासनाने केलेले नियोजन फळाला आले. मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी कार्यक्रमाला झाली होती. एसटीच्या बसेस जिल्ह्यातून भरून येत होत्या. जणू काही महिलांचे महासंमेलनच आहे, अशा पद्धतीने सभामंडप भरून गेले होते.
भाजप-राष्ट्रवादीची पाठ
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महिला बालकल्याण विकास मंत्री ना. आदिती तटकरे, पालकमंत्री ना. उदय सामंत आदी उपस्थित होेेते. मात्र भाजप व राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवरील नेतेमंडळींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौर्याची तयारीदेखील प्रशासनाने केली होती. बुधवारी सकाळी मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री येणार नसल्याचे समजताच भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.