मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत

भूमिपूजन, नामकरणासह महिला सन्मान सोहळ्यासाठी राहणार उपस्थित

रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुधवारी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. विमानतळ टर्मिनल भूमिपूजन, लोकनेते श्यामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय नामकरण आणि इमारत लोकार्पण तसेच महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत चंपक मैदानावर महिला सन्मान सोहळ्यासाठी ते येत आहेत. सकाळी ११ वाजता रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन, सकाळी ११.३० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे नामकरण आणि उद्घाटन, दुपारी १२.३० वाजता महिला सशक्तिकरण अभियान (मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना) प्रारंभ असे मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

पालकमंत्री अधिकाऱ्यांना श्री. सामंत म्हणाले, आरोग्य विभागाने कार्यक्रमाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची सोय करावी. चंपक मैदान येथे १५ बेडचे हॉस्पिटल तयार करावे. पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी पार्किंगची व्यवस्था, गर्दीचे नियंत्रण आणि वाहतूक नियमन करावे. वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फूड पॅकेटची व्यवस्था, नाश्ता याबाबतही नियोजन करावे. त्याचबरोबर स्वच्छतागृहांची सोयदेखील ठेवावी. मुख्यमंत्री महोदयांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असेही पालकमंत्री म्हणाले.