रत्नागिरी: महायुतीमध्ये प्रत्येकजण आपापल्या पक्षासाठी उमेदवारी मागत आहेत. असे न करता महायुतीचा उमेदवार निवडून आणू, असे म्हटले तर मतभेद होणार नाहीत. हे तारतम्य महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पाळावे. शिवसेना याचे पालन करेल. भाजप आणि राष्ट्रवादीकडून ही अपेक्षा आहे जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. महायुती पूर्ण ताकदीने लढली तर दोन्ही जिल्ह्यातील आठ जागा निवडून येतील, अशी प्रतिक्रिया सिंधुरत्न समितीचे सदस्य शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी व्यक्त केली.
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, लांजा-राजापुरात विधानसभा मतदार संघात महायुतीतील शिवसेनेच्या प्रचारासाठी मी फिरत आहे. इथे महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला बहुमताने निवडून आणू. राजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे; परंतु शिवसेनेत फूट पडल्यामुळे दोन गट तयार झाले. महायुतीचा उमेदवार निवडून येईल असे सध्याचे वातावरण आहे. अनेक वर्षे या भागात विकास झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून विकासकामे होतील, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांनी सत्ताधाऱ्यांच्या मागे निवडणुकीत उभे राहण्याचा संकल्प केला आहे. रत्नागिरी-राजापुरात भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. विकासकामे न झाल्यामुळे लोकांच्या मूलभूत गरजाही भागलेल्या नाहीत. ते काम महायुती करत आहे. महायुतीच्या माध्यमातून बऱ्याच कामांना सुरवात झाली आहे. शाळा, आरोग्य, पाणी, ग्रामीण रुग्णालये, बालवाड्या आदींचे दिल्ली मॉडेलप्रमाणे मजबुतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे सर्वच काही स्मार्ट दिसेल.