गणेशोत्सवाच्या कालावधीत पाणी पुरवठ्याबाबत नियोजन

रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेपेक्षा किती अधिक वेळ पाणी पुरवठा करता येईल, याची चाचपणी केली जात आहे. सध्या रत्नागिरी शहरवासीयांना दीड तास पाणी पुरवठा होत आहे.

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण ओसंडून वहात आहे. पावसाळा अंतिम टप्प्यात येईपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर मध्यापर्यंत हा ओव्हरफ्लो कायम असतो. नवीन नळपाणी योजनेमुळे सध्याच्या पाणी पुरवठ्याचा दाब चांगला आहे. त्यामुळे नळधारकांना वेळेत पुरेसे पाणी मिळत आहे.

नवीन नळपाणी योजनेमुळे शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याची मागणी अधूनमधून करण्यात येते. परंतु याबाबत कोणतेही नियोजन झालेले नाही. मात्र, गणेशोत्सव काळात काहीवेळ अधिकचा पाणी पुरवठा करण्याबाबतचे नियोजन केले जात आहे. येत्या काही दिवसातच अधिकचा कितीवेळ पाणी पुरवठा करता येवू शकेल, याची रत्नागिरी न.प.या पाणी विभागाकडून चाचपणी केली जात आहे.