साखरपा:- रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दिसून आलेले स्वरुप दिनकर माने (२४, रा. कवठेपिरान, जि. सांगली) आणि सुशांत श्रीरंग सातवेकर (१९, रा. निपाणी) या दोघांचे मृतदेह सहा तासांच्या मोहिमेनंतर दरीतून बाहेर काढण्यात पोलीस आणि ग्रामस्थांना यश आले. कागल येथील जंगली महाराज मठातील महाराजांचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.
आंबा घाटातील सड्याचा कडा ठिकाणाजवळ दोन मृतदेह शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आढळून आल्याने देवरुख व शाहूवाडी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह दाट जंगलात व खोल दरीत असल्याने पहिल्या दिवशी मृतदेह काढण्यास उशीर झाला मात्र रविवारी सकाळी पुन्हा मृतदेह काढण्यासाठी राजू काकडे हेल्प अकॅडमी देवरुख व आंबा हेल्प अकॅडमी आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विभागाने ही मोहीम पार पाडली.
दाट धुके, सुमारे तीनशे फूट खोल दरी व जंगल यामुळे मृतदेह काढण्यासाठी फारच कसरत करावी लागली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांची ओळख पाठविण्यात यश आले आहे.स्वरूप माने (वय २४, रा कवठे पिरान सांगली) व सुशांत सातवेकर (वय १९ निपाणी बेळगांव) यांचे असल्याचे समजले. दोघेही कागल येथील जंगली महाराज यांच्या आश्रमातील शिष्य होते अशी माहिती स्वरूप याचा भाऊ ओंकार माने यांनी साखरपा पोलिसांना दिली. धार्मिक आवड असल्याने ते शिष्य म्हणून आश्रमात राहत होते मात्र वातावरणात बदल म्हणून आठ ऑगस्ट ला घरी फोन करून पावस येथे जात असल्याचे सांगितले मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही .ओंकार यांच्या मालकीची दुचाकी एम एच १० डी जे २०२३ ही १७ ऑगस्ट चांदोली अभयआरण्य गेट जवळ आढळून आल्याने शोधाशोध सुरु केली असता दरीच्या दिशेने कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. आश्रमात येणारे भक्त महाराजांची चौकशी करत असल्याने त्यांना आठवण येत होती त्या नैराशेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते .ही घटना शाहूवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून मृतदेह देवरुख पोलीस स्थानकाच्या हद्दीत मिळाल्याने साखरपा पोलीस दुरक्षेत्रात नोंद करण्यात आली.