साखरपा:- आंबा (ता. शाहूवाडी) येथे अडीचशे फूट खोल दरीत स्वरूप दिनकर माने (२४, रा. कवठेपिरान, जि. सांगली) व प्रशांत श्रीरंग सातवेकर (१९) या दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस व खोल दरीत असलेले मृतदेह काढण्यास अडचण निर्माण झाल्याने शनिवारी शोधमोहीम थांबवण्यात आली. रविवारी सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू केली जाणार आहे.
आंबा येथील सडा नावाच्या दरी परिसरात वन विभागाचे कर्मचारी फेरफटका मारत होते. या ठिकाणी त्यांना एक दुचाकी आढळून आली याबाबत अधिक माहिती घेतली असता तेथून काही अंतरावर खोल दरीत दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले.
घटनास्थळी आढळून आलेल्या दुचाकीच्या तपासानंतर या तरुणांच्या नातेवाईकांचा शोध लागला. घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार या मृत युवकांची ओळख पटली. ही घटना शाहूवाडी व साखरपा पोलिसांना समजताच घटनास्थळी दोन्ही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करता मृतदेह खोल दरीत असल्याने बाहेर काढण्यास अडचण निर्माण होत आहे, त्यातच शनिवारी पाऊस असल्याने मृतदेह काढताना अडचण येत असल्याने हे मृतदेह काढण्याची मोहीम थांबवण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरु केली जाणार आहे. या घटनेबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.