रत्नागिरी:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून रत्नागिरी, चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. रत्नागिरी मतदारसंघातून बंड्या साळवी, उदय बने आणि राजेंद्र महाडिक यांनी उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. चिपळूणसाठी भास्कर जाधव, रोहन बने आणि राजेंद्र महाडीक हे इच्छुक आहेत. शिवसेनेचे सचिव आणि कोकणचे निरीक्षक मिलिंद नार्वेकर यांनी इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सचिव मिलिंद नार्वेकर रत्नागिरी दौऱ्यार आहेत. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेची राजकीय स्थिती काय आहे. अडचणी आणि प्रबळविरोधक कोण याबाबची इत्यंभूत माहिती पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन जाणून घेतल्या तसेच आगामी विधानसभेसाठी पक्षामध्ये इच्छुक कोण आहे, कोणाबाबत जनमत चांगले आहे आदींची चाचपणी केली. इच्छुकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचे काम नार्वेकर यांनी केले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक हे तिघे इच्छुक आहेत. नार्वेकर यांनी तिघांच्याही मुलाखती घेतल्या. चिपळूण-संगमेश्वर विधानसभेसाठी भास्कर जाधव, रोहन बने आणि राजेंद्र महाडिक इच्छुक आहेत. महाडिक हे दोन्ही मतदार संघातून इच्छुक आहेत. त्यांच्याही मुलाखती झाल्या आहेत. नार्वेकर दोन दिवसाच्या या दौऱ्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहेत.