अंशतः अनुदानित शिक्षकांच्या टप्पा वाढीचा प्रश्न निकाली लावण्यासाठी १६ ऑगस्टपासून आंदोलन

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या टप्पा वाढीचा प्रश्न निकाली निघालेला नाही. यामुळे शिक्षक समन्वय संघातर्फे 16 ऑगस्ट पासून आझाद मैदान येथे वेतन अनुदानाच्या टप्पा वाढीचा निर्णय होईपर्यंत शासनाविरोधात हुंकार आंदोलन केले जाणार आहे.

अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणार्‍या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शासन निर्णय 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 मधील तरतुदीनुसार 1 जानेवारी 2024 पासून प्रतिवर्षी नैसर्गिक वाढीने टप्पा अनुदान देणे, शासनाच्या चुकीमुळे शासन निर्णय 12, 15 व 24 रोजीच्या नमूद केलेल्या 30 दिवसाच्या आत शासनस्तरावर त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तुकड्यांना समान टप्प्यावर आणणे, राज्यातील पुणे स्तरावर अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान मंजूर करणे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर केले जाणार आहे.

राज्यात काही प्राथमिक शाळा 20, 40, 60 टक्के अनुदानावर आहेत तर काही माध्यमिक शाळा 20, 40, 60 टक्के अनुदान घेत आहेत. अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळा काही 20 तर काही 40 टक्के वेतन अनुदान घेत आहेत. या सर्वच शाळा 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार 100 टक्के वेतन अनुदानाच्या दावेदार आहेत. असे असताना राज्य शासनाकडून शिक्षकांचं शोषण केले जात असल्याचे विदारक चित्र सध्या समोर येत आहे.