गुहागर:- मासेमारीसाठीची पूर्वतयारी करायला गेलेल्या गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील तरुण खलाशाचा रायगड जिल्ह्यातील करंजा येथील समुद्रात बोटीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सिध्देश शांताराम मोरे (वय २७) असे या तरुणाचे नाव आहे. वेळणेश्वर वाडी खाते येथील सिद्धेश हा खलाशी म्हणून करंजा रायगड येथील बोट मालक किसन कोळी यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. तीन दिवसांपूर्वी मासेमारीसाठी पूर्वतयारी करायला गेले असताना करंजा- रायगड येथील अगदी नजिकच्या समुद्र किनारी बोटीतून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना 5 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता घडली. पाण्याची पातळी जास्त खोल असल्याने शोध कार्यात अडथळा येत होता मात्र पाण्याची पातळी कमी झाल्यावर म्हणजे समुद्राला ओहोटी सुरू झाल्यानंतर मृतदेह त्याच ठिकाणी आढळून आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज मंगळवार सकाळी ९ वाजता वेळणेश्वर येथील स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.