रत्नागिरी:- विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येवून ठेपली आहे. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच मुख्य लढत रंगणार आहे. जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या पाचही मतदारसंघातील विद्यमान आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतील असेच चित्र आहे. असे असले तरी या पाच आमदारांविरोधातील उमेदवार अद्यापही निश्चित नाहीत.
विद्यमान आमदार त्यांच्या सध्याच्या मतदारसंघातूनच लढतील असेही बोलले जाते. योगेश कदम दापोली-मंडणगड-खेडमधून, शेखर निकम चिपळूण-संगमेश्वरमधून, राजन साळवी लांजा-राजापूरमधून तर पालकमंत्री ना. उदय सामंत हे रत्नागिरी-संगमेश्वरमधून आपापल्या पक्षाच्यावतीने लढतील हे जवळपास निश्चित मानले जात असतानाच पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची उत्सूकता आहे. या उमेदवाराबाबत अजूनही महाविकास आघाडीमध्ये शांतता दिसून येत आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाकडे राहील असा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी राष्ट्रवादी कॉगे्रस शरदचंद्र पवार पक्षानेदेखील हा मतदारसंघ मागितला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे अजूनही स्पष्ट्र होत नाही. एकीकडे महाविकास आघाडीच्या गोटामध्ये शांतता असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी मात्र मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीकोनातून हालचाली सुरु केल्याचे दिसते आहे. अर्थात या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी देखील भाजपने केल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत बोलताना ना. उदय सामंत यांनी वरिष्ठ त्याबाबतचा निर्णय घेतील अशी भुमिका मांडली असली तरी मतदारसंघात त्यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी आता सुरु केली आहे. जि.प.गटानुसार दौरे सुरु झाले आहेत. ही जागा विद्यमान असल्याने महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गटालाच मिळेल असा आत्मविश्वास शिवसैनिकांना दिसतो आहे. ना. सामंत हे तयारीला लागले आहेत. शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने ना. सामंत मतदारसंघात दौरा करत असून भगिनींचा मोठा पाठिंबा त्यांना मिळताना दिसतो आहे. 18 ऑगस्टला लाडक्या बहीणीच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे एकूण 3 हजार रुपये जमा होतील असे सरकारने जाहीर केले आहे. सरकारच्या या योजनेवर भगिनीवर्ग खुष असल्याचे दिसत असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हातावर राखी बांधून गावागावातील भगिनी या योजनेचे स्वागत करत आहेत. या योजनेसह उदय सामंत आपण मतदारसंघात आजवर केलेल्या कामांचा लेखाजोखा दौर्यामध्ये मांडत आहेत. अनेक कामे मार्गी लागली असली तरी राहिलेल्या कामाचा आढावा ते घेत आहेत. आचारसंहितेपूर्वी जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपही त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात तयारीला लागला आहे. वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा मानस आहे. म्हणजे शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष या मतदारसंघात तयारीला लागले असताना महाविकास आघाडीच्या गोटात मात्र शांतता पहायला मिळते आहे. शिवसेना ठाकरे गटाला ही जागा मिळेल असा कार्यकर्त्यांचा अंदाज असून राजकीय वर्तुळातदेखील तशीच शक्यता वर्तविण्यात येत आहे. माजी खा. विनायक राऊत यांच्या अनपेक्षीत पराभवानंतर ठाकरे गटात शांतता पसरली असून ती अजूनही कायम आहे. तालुकाप्रमुख प्रदिप तथा बंड्याशेठ साळवी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष उदय बने हे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा गेली अनेक दिवस सुरु आहे. मात्र त्याबाबत अजूनही निश्चिती नाही. काँग्रेसला राजापूर मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर दावा केलेला नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याविषयी अजूनही स्पष्टता नाही. शिवसेना ठाकरे गटात इतकी अस्वस्थता का असा सवाल शिवसैनिकच उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमिवर निवडणूक 2 महिन्यांवर येवून ठेपली तरी महाविकास आघाडीत शांतता आहे.