रत्नागिरी:- शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाले नाहीत. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी शाळेचा गणवेश व्यवस्थित असावा, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते; मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 70 हजार 552 मुला-मुलींना जुनाच गणवेश घालून शाळेत जाण्याची वेळ येणार आहे. विशेष म्हणजे एका गणवेशासाठी शासनाकडून आलेले कापड अजूनही तालुक्यालाच पडलेले असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे.
समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पाठ्यपुस्तकांप्रमाणेच गणवेशही मिळणार होते; परंतु शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. राज्य सरकारकडून गणवेश मिळेल, किमान स्वातंत्र्यदिनापूर्वी गणवेश मिळेल, या आशेवर विद्यार्थी-पालक आहेत.
राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे इयत्तानिहाय स्वरूप निश्चित केले आहे. त्यानुसार पहिली ते चौथीच्या मुलींना पिनो फ्रॉक, पाचवी ते सातवीच्या मुलींना शर्ट आणि स्कर्ट, आठवीच्या मुलींसाठी सलवार कमीज ओढणी असा गणवेश निश्चित करण्यात आला आहे; तर पहिली ते सातवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि हाफ पँट, तर आठवीच्या मुलांना हाफ शर्ट आणि फुल पँट असा गणवेश दिला जाणार आहे.
स्काऊट-गाईड विषयाला अनुरूप असेल, असा आकाशी आणि गडद निळा असे रंग असलेला गणवेश शिवला जात आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचे सरकारी निर्णय प्रसिद्ध करत गणवेश कसा असेल, याची रूपरेषा ठरवली होती.
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक गणवेश शिवून देण्याची जबाबदारी महिला आर्थिक महामंडळाकडे देण्यात आली होती. महामंडळाने जिल्ह्यातील काही बचत गटांना हे गणवेश शिवण्याचे काम दिले होते. असे असले तरी कापडच शासनाने उशीरा पुरवल्याने महामंडळेही अडचणीत सापडले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच मोफत पाठ्यपुस्तकांनंतर काही दिवसांत नवा कोरा गणवेश मिळेल, असा दावा शिक्षण विभागाकडूनही केला गेला होता. मात्र अद्याप जिल्ह्यातील एकाही शाळेतील विद्यार्थ्याला गणवेश मिळालेला नाही. एक गणवेश हा महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत तर दुसरा गणवेश हा शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आला आहे. यासाठी कापड तालुका स्तरावर आले आहे. मात्र अजूनही हे कापड शाळा स्तरावर गेले नसल्याचे धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तालुका शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. अजूनही तालुकास्तरावर असल्याने स्वातंत्र्यदिनी गणवेश मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे.