जि. प. कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

रत्नागिरी:- ग्रामीण भागाचा विकास गतिमान करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व तीव्र नाराजी आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १२ या कालावधीत एक तासाचे धरणे आंदोलन जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात येणार आहे असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाकडून देण्यात आली.

राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक समन्वय समितीने १४ डिसेंबर २०२३ ला बेमुदत संप पुकारला. त्यावेळी विधीमंडळात चर्चा करण्यात आली होती. अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा शासन निर्णय २ फेब्रुवारी २०२४ ला वित्त विभागाने काढला. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासनाने काढलेला प्रत्येक शासन निर्णय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जशाच तसा लागू करण्याचा प्रघात आहे. परंतु आजमितीस ६ महिन्यांचा कालावधी होवूनही निर्णय झालेला नाही. ग्रामीण भागाचा विकास गतिमान करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर हा एकप्रकारे अन्याय आहे. या विरूध्द जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व तीव्र नाराजी असून या बाबतीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी १ ऑगस्ट रोजी काळ्या फिती आंदोलन केले.
या आंदोलनात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सुमारे ३५०० कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश सिनकर, सचिव प्रविण पिलणकर व कार्याध्यक्ष सुरेंद्र खाडे यांनी दिली.