रत्नागिरी:- शिक्षण हक्क कायदा अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. ऑनलाईन सोडत निघाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 812 जागांसाठी 570 जणांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी 242 पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे. यादीत निश्चित झालेेल्यांना 31 जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे.
आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के रिक्त जागांवर प्रवेश देण्यासंदर्भात खासगी शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परिणामी मागील दीड महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया रखडली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने 19 जुलै रोजी आरटीई प्रवेश पद्धतीत बदल करण्यासाठी काढलेली अधिसूचना न्यायालयाने रद्द केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक वर्षाला दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली नसल्याने पालक, विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले होते. आता मात्र मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात 97 शाळांमध्ये 872 जागा आहेत. यासाठी 777 अर्ज दाखल झाले होते. याची छाननी करण्यात आली. यानंतर 570 अर्ज वैध ठरवण्यात आले. यामुळे या सर्वांची यादी 22 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. आरटीई 25 टक्के प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांनी 31 जुलै 2024 पर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आरटीईच्या यादीत 570 जणांचा लॉटरी पद्धतीने समावेश करण्यात आला. यामुळे आता 242 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. या जागांसाठी शासन पुन्हा मुदतवाढ देणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. कारण अगोदरच दीड महिना या प्रक्रियेला उशीर झाला आहे.