शिक्षकांच्या रिक्त जागांवर डीएड, बीएड बेरोजगारांना संधी द्या

स्थानिक बेरोजगार संघटना आक्रमक; उपोषणाचा इशारा

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदांची संख्या जास्त असून या जागेवर जिल्ह्यातील मानधन तत्वावर डीएड, बीएड बेरोजगारांना संधी द्यावी, अशी मागणी स्थानिक बेरोजगार संघटनेने केली आहे. याबाबत आक्रमक पवित्रा घेत 15 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे, तसे पत्र जिल्हा प्रशासनाला त्यांनी दिले आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागेवर स्थानिक मानधन तत्त्वावरील शिक्षक यांच्या नियुक्तीची मागणी होत असून ती पूर्ण न केल्यास स्थानिक रत्नागिरी जिल्ह्यातील मानधन तत्त्वावरील शिक्षक डीएड, बीएड बेरोजगार संघटना आक्रमक पवित्रा घेणार असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागात नव्याने शिक्षक भरती होऊन देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत.
मागील शैक्षणिक वर्षात मानधन तत्त्वावर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने जिल्हा परिषदेने अतिशय जलद गतीने स्थानिक शिक्षकांना संधी दिली होती. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर नवीन भरती झाल्याने सर्व स्थानिकांना कार्यमुक्त करण्यात आले. नवीन शिक्षक भरती होऊन देखील आजही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत.

स्थानिक मानधन तत्त्वावरील शिक्षक पुनर्नियुक्तीसाठी वारंवार पाठपुरावा करत असून याबाबत शासन अनुत्सुक असल्याचा आरोप बेरोजगार संघटनेकडून होत असून स्थानिक नेत्यांमध्ये देखील स्थानिक बेरोजगार डिएड, बीएड धारकांबद्दल आस्था दिसत नाही.
अनेक पदवीधर बेकार झाले आहेत. इतर जिल्ह्यातील वेगळे चित्र पहायला मिळत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
स्थानिकांच्या पाठीशी स्थानिक नेते उभे राहताना दिसत नसल्याचा आरोप संघटनेकडून होत असून शासकीय भरतीमधे स्थानिक आरक्षण नसल्याने मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांचा भरणा होत आहे. मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येत असल्याने याचा फटका अर्थकारणावर देखील बसत आहे.
याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून 15 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.