रत्नागिरी एमआयडीसीतील रुग्णालयातील गर्भपात प्रकरणी मोठी कारवाई; डॉक्टर चौकशीसाठी ताब्यात

रत्नागिरी:- शहरालगतच्या एका खाजगी दवाखान्यावर वैद्यकीय पथकाची धाड पडली असून या पथकाने त्या रुग्णालयात सुरू असलेल्या गर्भपात प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई आरोग्य पथक आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई होती. पोलिसांनी एमआयडीसी परिसरातल्या डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर विष्णु जगताप, (वय ५६ वर्ष, व्यवसाय नोकरी जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १३३/२०२४, वैद्यकीय गर्भपात कायदा सन १९७१ चे कलम ४ व ५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. दि. २६/०७/२०२४ रोजी १८.३८ वाजता टीआरपी रत्नागिरी येथील साई हॉस्पिटलचे पोलिस डायरीत नमुद तथाकथित डॉक्टर अनंत नारायण शिगवण, वय (६७ वर्ष, राहणार एमआयडीसी, प्लॉट नं. २० टीआरपी रत्नागिरी) यांच्याकडे वैद्यकीय गर्भपात कायदा सन १९७१ व सन २०२३ मध्ये नमुद आवश्यक असलेली वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसताना तसेच रुग्णालयाला गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून अनधिकृतपणे रुग्णांना देत असल्याचा ठपका तपास यंत्रणेने ठेवला. वैद्यकीय गर्भपात कायदा सन १९७१ चे कलम ४ व ५ प्रमाणे त्यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.