आर्जु टेक्सोल फसवणूक प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

रत्नागिरी:- आर्जु टेक्सोल फसवणूकप्रकरणी गुन्ह्यातील संचालक प्रसाद फडके, संजय सावंत, संजय केळकर आणि अमन उर्फ ॲनी जाधव या चार जणांविरोधात पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात शुक्रवारी १५ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

या चार जणांनी मिळून आर्जु टेक्सोल कंपनीची नोंदणी आणि स्थापना करून कंपनीची पत्रके लोकांमध्ये वाटून, स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन जॉबवर्क पद्धतीने काम घ्या आणि आम्हाला प्रोडक्ट तयार करून द्या, जास्तीत जास्त उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी अशा जाहिराती दिल्या होत्या. त्यानंतर संशयितांनी लोकांकडून डिपॉझिट घेऊन त्यांना वेगवेगळ्या मशिन, कच्चा माल दिला. त्यानंतर तयार केलेला माल परत घेऊन त्या बदल्यात योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले. गुंतवणूकदारांना ६० महिने बँकेपेक्षा जास्त परतावा देतो व ६० महिन्यांनतर डिपॉझिटची रक्कमही परत करता, असे सांगून ५६९ जणांची तब्बल ६ कोटी ६३ लाख ६० हजार १८२ रुपयांची फसवणूक केली. यातील ॲनी जाधव अजूनही फरार असून, उर्वरित तीन संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४),३१६ (२), ३ (५) तत्सम भादंवि कलम ४२०, ४०६,३४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याच्या तपासात सबळ पुरावा प्राप्त करून हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या गुन्ह्यात पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, मुख्यालयातील उपअधीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे व त्यांच्या पथकाने केला आहे.