रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट

रत्नागिरी:- गेले महिनाभर पावसाने संपूर्ण कोकणपट्टीसह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असतानाच अद्यापही पावसाचं हे तांडव थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. हा आठवडा तर मुसळधार पाऊस पडत असतानाच कोकणपट्टी मुसळधार पावसामुळे हादरून गेली आहे. गुरुवार २५ जुलै रोजी पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई येथे रेड अलर्ट होता. आता पावसाचा जोर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. रायगड सह रत्नागिरी जिल्ह्याला आज २६ जुलैचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

२६ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवार प्रमाणेच शुक्रवारी ही रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल असे चिन्ह आहे. दरम्यान बुधवारी रात्रीपासूनच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडून ही नदी आठ मीटरच्या ही वर वाहत आहे. त्यामुळे खेडला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथील वाशिष्टी, शास्त्री, मुचकुंदी, काजळी, कोदवली या नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे.

त्यामुळे २६ जुलै या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यावर रेड अलर्टचे सावट दिसून येत आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.