रत्नागिरीतील पत्नीला फोनवर तलाक देणाऱ्या सौदीतील पतीवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- सौदी अरेबियातून फोनवर रत्नागिरीतील पत्नीला ट्रिपल तलाख देणाऱ्या पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ जुलै २०२३ रोजी ५.३० ते १३ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्यमनगर पटवर्धनवाडी येथे घडली आहे . दिलावर अब्दुल रशिद साखरकर ( ४२ , मुळ रा . लूलू दारुस सलाम अपार्टमेंट उद्यमनगर , रत्नागिरी सध्या , रा . सौदी अरेबिया ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे . त्याच्या विरोधात पत्नीने गुरुवार दि . २५ जुलै रोजी सायंकाळी ४. ३३ वाजता शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली . त्यानुसार , दिलावर साखरकर याने २७ जुलै २०२३ रोजी पत्नीला फोन करुन तीन वेळा तलाक असे म्हणून चुकीच्या पद्धतीने तलाक देण्याचा प्रयत्न केला.

हा तलाक बेकायदेशीर असून मुस्लीम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण कायदा २०१९चे कलम ४ प्रमाणे असल्यामुळे शहर पोलिस स्थानकात या महिलेने तक्रार दाखल केली असून पो . नि . महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप नि . भगवान पाटील यांनी संशयित आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा . पो . फौ . राजेंद्र सावंत करीत आहेत.