आर्जू टेक्सोल फसवणूक प्रकरण सहा कोटींच्या घरात; आणखी आरोपींचा कसून शोध

रत्नागिरी:- आर्जू टेक्सोल फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अ‍ॅनी उर्फ अमर जाधव हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याने नाशिक येथील महिलेची आर्थिक फसवणूक केली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु, याबाबत नाशिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, अ‍ॅनी हा आर्जू प्रकरणात अजूनही पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा कसून शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्जु प्रकरणात गुन्हे शाखेकडून आतापर्यंत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, पूणे, औरंगाबाद व सातारा जिल्ह्यातील बळी पडलेल्या एकूण 544 साक्षिदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. यात आतापर्यंत फसवणूक झालेली रक्कम 6 कोटी 11 लाख 19 हजार 462 वर गेली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रसाद शशिकांत फडके (34, रा. गावखडी, रत्नागिरी), संजय गोविंद केळकर (49, रा. तारवेवाडी-हातखंबा, रत्नागिरी), संजय विश्वनाथ सावंत (33, रा. पुनस, लांजा) या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेकडून यापूर्वी अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे तर अ‍ॅनी उर्फ अमर जाधव हा अद्याप फरार आहे.

आर्जू प्रकरणात चौघांनी मिळून आर्जू टेक्सोल कंपनीची स्थापना केली. त्यानंतर जॉब वर्क पध्दतीने काम घ्या. आम्हाला प्रोडक्ट तयार करून दया, जास्तीत जास्त उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसाय करू इच्छिणार्‍यांना रोजगाराची सुवर्ण संधी अशा स्वरुपाची जाहीरातीचे पांपलेट छापून वाटण्यात आले होते तसेच आरोपींनी गुंतवणुकदारांना 25 हजार ते 40 लाख डिपॉजिटच्या 15 महिने, 36 महिने व 60 महिने या कंपनीच्या स्किम सांगुन कंपनीमध्ये डिपॉजिट ठेवलेल्या रक्कमेवर रिटर्न ऑफ इन्कम म्हणून गुंतवणुकदारांना आकर्षक परताव्याचे अमिष दाखविले होते. तसेच गुंतवणूकदारांकडून वेगवेगळी घरघुती व किरकोळ उत्पादने बनविण्याकरिता वेगवेगळी रक्कम ठरवून डिपॉजिट घेण्यात आले व गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.