सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांच्या दरबारात

साहेब, जनतेचा रोष वाढतोय; खड्डे तात्काळ बुजवा

रत्नागिरी:- शहरातील नागरिक रस्त्यातील खड्यांमुळे प्रचंड त्रस्त आहेत. याबाबत जनतेच्या भावना तीव्र आहेत. जनतेच्या भावना लक्षात घेवून सत्तारुढ पक्षाचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी बुधवारी पालिकेवर धडकले. खड्ड्यांबाबत मुख्याधिकारी जाब विचारला आणि खड्डे जांभ्या दगडानी न भरता खडी, पावसाळी डांबरांनी बुजवा. त्यासाठी अधिक मनुष्यबळ वाढवा पण लोकांना सुरळीत रस्ता करुन द्यावा, अशी मागणी यावेळी केली.

रत्नागिरी शहरात काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यापैकी काही प्रमाणात हे काम झाले आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी डांबरीकरणाचा सिलकोट टाकण्यात आला. परंतु पावसाळा सुरू झाल्यामुळे काँक्रिटीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी टाकण्यात आलेला सिलकोट पावसामुळे वाहुन गेला. शहरातील बहुतेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. वाहनधारक आणि नागरिक त्यामुळे हैराण झाले आहेत. संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या येत आहेत. जनतेच्या भावना लक्षात घेवून सत्तारुढ पक्षाचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी बुधवारी पालिकेवर धडकले.

खड्डे पावसाळी डांबरांनी बुजवा. त्यासाठी जादा मनुष्यबळ लावून नागरिकांना आणि वाहनधारकांना लवकरात लवकर दिलासा द्यावा. पालिका आणि नागरिक यांच्यात चांगला समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी आम्ही यशस्वी पार पाडू, असे शिवसेनेचे पदाधिकारी राजन शेट्ये यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या प्रमाणात शहरात निधी आणला आहे. त्याचा योग्य वापर व्हावा, असेही शेट्ये म्हणाले.त्याच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी बंटी कीर, मनोज साळवी, बाळू साळवी, बारक्या हळदणकर, सुहेल मुकादम, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या