रत्नागिरी:- राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पहिली ते बारावीपर्यंत सोमवारपासून शिक्षण सप्ताहाला सुरुवात झाली. २८ जुलैपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या २५० शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंवर शिक्षण सप्ताहात मंथन होणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत दिनांक २२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ कालावधीत प्रत्येक शाळेत राबविण्यात येणार आहे. हा शिक्षण सप्ताह अंगणवाडी केंद्रात देखील राबविण्यात येणार आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत राजमाता जिजाऊ वाचन क्लबची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत मुलांनी गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन केले. त्यातील महत्त्वाच्या घटकांची नोंद केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ठसा चित्र काढले. कांदा, भेंडी, पाने, फुले यांची ठसा चित्रे काढली. शिक्षण सप्तांतर्गत सात दिवस शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सोमवारी शाळेत टाकावू पासून टिकाऊ असे पायपुसणी, दरवाजाचे तोरण विद्यार्थ्यांनी तयार केले. रत्नागिरी तालुक्यातील जांभरुण शाळेत मोठ्या उत्साहात हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. केंद्रप्रमुख अमर घाडगे त्यांच्या मार्गदर्शनखाली राबविण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक राजेश पवार, संतोष रावणंग, राजू कोकणी, यास्मिन कोतवाल यांनी विशेष मेहनत घेतली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनीसुद्धा शाळांना भेट देऊन या उपक्रमांबाबत माहिती व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, गटशिक्षणाधिकारी सुनिल पाटील आदी उपस्थित होते.