कळझोंडी धरणाचा पंप बंद पडल्याने भर पावसाळ्यात 28 गावे पाण्यापासून वंचित

रत्नागिरी:- ऐन पावसाळ्यात जयगडमधील 28 गावांवर पाणीबाणीचे संकट कोसळले आहे. कळझोंडी धरणावरील पंप बंद पाडण्याचा मोठा फटका या गावांना बसला आहे. मागील आठ दिवसांपासून येथील 28 गावांमध्ये पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

रत्नागिरी तालूक्यातील कळझोंडी धरणातुन 28 गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या कामासाठी डिसेंबर 2023 नंतर पाणीपूरवठा बंदच ठेवण्यात आला होता. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे पाउस सुरु होईपर्यंत जिंदाल कंपनीच्या मार्फत पाणी पुरवठा सुरु ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आता धरणाचे काम देखील पूर्ण झाले आहे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरण देखील ओव्हर फ्लो भरुन वाहु लागले. धरण भरल्याने आता नियमित पाणी पुरवठा होईल या आशेने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु 15 जुलैच्या नंतर धरणाचा पंप जळाला आणि पाणी पूरवठा आठवडाभर खंडीत झाला. पंप जलाल्यानंतर आठवडा भराच्या कालावधी नंतर देखील कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने भर पावसात वाटद -जयगड परिसरातील लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

आठवडा झाला तरी जिल्हापरिषदच्या पाणीपुरवठा विभागाकडुन पाहीजे तेवढी तत्परता दिसुन येत नाही असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. या गावातील सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने याबाबत पाठपुरावा करीत आहेत. बिघडलेल्या पंपाचे काम त्वरीत पुर्ण व्हावे याची मागणी करण्यात येत आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता दाभोळकर यांनी जास्त लक्ष घालावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.