रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून तीन इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी: विनायक राऊत

रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून, प्रत्येक पक्षाने मतदार संघात तयारी सुरु केली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पक्षांतर्गत चाचपणी सुरु असून माजी नगराध्यक्ष व तालुकाप्रमुख प्रदीप साळवी आणि माजी जि.प. अध्यक्ष उदय बने आणि तालुका संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर हे इच्छूक असून, यातील एकाला उमेदवारी दिली जाईल, असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेतून विजयी झालेले उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेल्याने या मतदार संघात त्यांच्या तोडीस तोड असा उमेदवार देण्याबाबत पक्षाकडून चाचपणी सुरु करण्यात आली आहे.
याबाबत माजी खासदार विनायक राऊत म्हणाले की येत्या काही दिवसात मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेतली जाणार आहे. तालुकाप्रमुख प्रदीप साळवी व माजी जि.प. अध्यक्ष उदय बने यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे तर तालुकासंपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या ठिकाणी स्थानिक उमेदवारच दिला जाणार असल्याचे माजी खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वीच सर्व संपर्कप्रमुखांची बैठक घेतली असून, सर्वांनाच कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथील पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन मार्ग काढला जाणार आहे.

महाविकास आघाडी म्हणूनच या ठिकाणी निवडणूक लढवली जाणार असल्याचेही माजी खा. राऊत यांनी सांगितले. सर्वच पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन नाव सूचवावे असे सांगण्यात आले होते. परंतु, पदाधिकार्‍यांकडून वेगवेगळी नावे पुढे येत आहेत. त्यामुळे लवकरच यावर ‘उबाठा’कडून रत्नागिरीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. माजी जि.प. अध्यक्ष उदय बने यांनी गेली 35 वर्ष ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत कामकाज पाहिले आहे.