काजळी नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव

रत्नागिरी:- तालुक्याच्या काजळी नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या विजेचा लपंडाव न थांबल्यास चार ते पाच गावातील ग्रामस्थ महावितरणवर धडक देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून काजळी नदीच्या किनार्‍यावरील तोणदे, हातीस, टेंबेपूल व परिसरातील गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरु आहे. याबाबत ग्रामस्थांकडून महावितरणकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या भागांना पूर्वी कुवारबाव येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येत होता. मात्र त्यानंतर तो पानवल येथील नव्या उपकेंद्रातून सुरु करण्यात आला. त्यानंतर डोंगरी भागातील या गावांमध्ये सातत्याने विजेचा लपंडाव सुरु झाला आहे.
वीज वेळीअवेळी जात असल्याने नळपाणी योजनांवर त्याचा परिणाम होत असून, पिण्याचे पाणीही नियमित येत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. पानवलकडून येणारी ही वाहिनी डोंगरातून झाडीझुडपातून आणि नदी किनार्‍यावरुन टाकण्यात आली असल्याने, रात्री अपरात्री वीज गेल्यावर दोष शोधून काढणेही लाईनमनना कठीण बनले आहे. त्यामुळे या ट्रान्सफार्मरपर्यंत आलेली वीज वाहिनी ही भूमिगत करुन द्यावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

महावितरणचा कारभार सुधारला नाही तर पंधरा दिवसात पंचक्रोशीतील ग्रामस्थ महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे वीज बिले भरण्यावरही बहिष्कार टाकण्यात येईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.